Friday, June 16, 2017

सृजन सोहळा


आमच्या पाच खणी घराच्या प्रत्येक खोलीची एक भिंत पूर्णपणे काचेची आहे. अगदी स्वयंपाक घर सुद्धा त्याला अपवाद नाही. खरं म्हणजे प्रत्येक खोलीला एक एक व्हरांडा आहे आणि तिथे जाण्यासाठी पूर्ण भिंतीला काचेचे दरवाजे आहेत. त्यामुळे घरात भरपूर उजेड आणि मोकळी हवा असते. त्यापैकी तीन खोल्यांच्या व्हरांड्यात मी बाग केली आहे. पडदे बाजूला सारले की नजरेसमोर बागेची हिरवाई डोळ्यांना सुख आणि मनाला शांती देते आणि माझ्या प्रत्येक दिवसाची सुरवात नेहमी सुंदर होते. आमच्या ह्या घरात एक पसाऱ्याची खोली आहे. इथे आम्ही कितीही पसारा केला तरी तो आवरून ठेवायलाच हवा असा नियम नाही. रंग, कॅनव्हास, ब्रश, वेगवेगळ्या प्रकारचं हस्तकलेचं सामान, मातीची भांडी, विविध प्रकारचे कागद, आम्ही भेट दिलेल्या ठिकाणी खरेदी केलेल्या किंवा जमविलेल्या वस्तु, फोटोंचे अल्बम, वाचनाची पुस्तकं, लिखाणाचं टेबल, बागकामाचं सामान अशा कितीतरी छान छान वस्तू इथे आहेत. ह्या खोलीच्या व्हरांड्यात आमची छोटी बाग आहे. ह्या व्हरांड्याला आम्ही वरील अर्ध्या बाजूने तंगुसाची जाळी बसविली आहे. आम्ही दोघं दिवसभर घरी नसल्याने सुरवातीला कबुतरांनी आमच्या व्हरांड्यांचा ताबा मिळविला होता. बाजारात मिळते ती कबुतरांना अटकाव करणारी जाळी खूपच जाड असते आणि त्यामुळे बाहेरचं सगळं दृश्य जाळीदार होऊन दिसतं. त्यावर उपाय म्हणून आम्ही ही तंगुसाची जाळी शोधून लावली. आम्हाला हवं तेव्हा सोयीनुसार आम्ही तिला गुंडाळून वरती ठेवतो. खासकरून पावसाळ्यात.

एकदा बागेला पाणी घालताना मला एका रोपट्याचा पानावर खालच्या बाजूला एक पांढुरक्या रंगाचा ठिपका दिसला. कसलीतरी कीड असावी असा मी आधी अंदाज बांधला. सुट्टीच्या दिवशी त्याचा बंदोबस्त करावा ह्या विचाराने मी त्याकडे दुर्लक्ष केले. पण नंतर ते पान दिसलं नाही आणि पांढऱ्या रंगाचे ठिपके देखील. मी सुध्दा पूर्णतः विसरून गेले कीडीविषयी. एक महिन्यानंतर जेव्हा मी सुट्टीच्या दिवशी आरामात बसून एका एका रोपट्याला नीट बघत होते तेव्हा मला एका पानाखाली तपकिरी काळसर रंगाचा कोश दिसला. मला वाटलं मोट्ठी कीड आली आणि आता ही सगळ्या रोपट्याला फस्त करेल. मी औषध आणायला उठणार एवढ्यात मला काही कळायच्या आत त्यातून पंख मिटलेल्या अवस्थेतील काळ्या रंगाचे एक सुंदर फुलपाखरू बाहेर पडले पण ते त्या कोशाला चिकटुनच होते. माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदाच फुलपाखराचा जन्म होताना पहात होते. सवयीनुसार मी मोबाईलने आधी फोटो काढले. ५-७ फोटो काढेपर्यंत फुलपाखराने आपले पंख हलवायला सुरवात केली होती. हळूहळू त्याने आपले दोन्ही पंख पसरले आणि त्यावरील नक्षी पाहून मी ते कोणत्या प्रकारचे असावे ह्याचा विचार मी करू लागले पण काही सेकंदाच्या आतच फुलपाखराने आपली जागा बदलली. कोशाला सोडून ते शेजारच्या फांदीखाली सरकलं. फोटो बघून त्याचा प्रकार कोणता हे नंतर देखील ओळखता येणार होते. पण हे फुलपाखरू जर ह्या गतीने सरकायला लागलं तर ते लवकरच ते उडायला लागेल ह्या विचाराने मी आधी व्हरांडयाचे दरवाजे बंद करून घेतले. आता त्याला घरात शिरता येणार नव्हतं. उगाच बिचारं कुठेतरी अडकलं असतं. आता ते एक फांदीवरून दुसऱ्या फांदीवर उडून बसू लागलं. आपल्याला उडता येतं ह्याचा त्याला साक्षात्कार झाला होता. जन्म होऊन फक्त काही मिनिटेच झाली होती. मी सुद्धा व्हरांड्याच्या एका कोपऱ्यात बसून त्याच्या उडण्याचा आनंद दोन्ही डोळ्यांनी टिपत बसले. हळूहळू ते हवेत गिरक्या घेऊ लागलं आणि मला उमजून चुकलं हा पाहुणा आता काही आपल्या बागेत राहायचा नाही. ते बहुधा भुकेलं असावं आणि खाण्यासाठी फुलातला मध शोधत असावं. मधूनच उडत उडत ते तंगुसाच्या जाळीवर जाऊन आपटत होतं. मग मी हळूच ती जाळी खालून वर गुंडाळायला सुरवात केली. ते वरच्या वर उडत होतं. जेव्हा त्याला मोकळं अवकाश मिळालं तेव्हा ते पटकन बाहेर उडून गेलं. मी त्याच दिवशी नवीन फुलझाडं आणून बागेमध्ये लावली. कधीतरी फुलांतील मध खायला आपल्या जन्मस्थानी ते परत येईल ह्या आशेने मी पुढचे काही दिवस जाळी उघडी ठेवली होती.  पण त्यानंतर कोणतच फुलपाखरू बागेच्या आसपास फिरकलं नाही.

त्या फुलपाखराची मादी कशी आणि कधी आली असेल माझ्या बागेत? मी त्याचवेळी जर ते अंड कीड समजून काढून टाकलं असतं तर? निसर्गाच्या एका सृजन सोहळ्याला मी मुकले असते. माझ्या बागेत जन्मलेल्या त्या जिवाची आठवण मी माझ्याकडे जपून ठेवली आहे... फोटोंच्या स्वरूपात.  त्यातले काही इथे पोस्ट केले आहेत.Thursday, June 8, 2017

उरलं सुरलं


बालकवींची एक सुंदर कविता आठवली हा लेख लिहून पूर्ण झाल्यावर. अर्थात डोळे पाणावले... मग भावना आणि कवितेचे शब्द गुंतून गेले एकमेकांत... आपोआप .

चिव चिव चिव रे तिकडे तू कोण रे?

उशिरा वयात लग्न म्हंटलं की तडजोड आणि संयम हातात हात घालून येतात. कोणत्या गोष्टींशी तडजोड करावी लागेल ह्याचा एक आराखडा मी मनाशी बांधून ठेवला होता; पण तेच जर एकतर्फी घडू लागलं तर संसारात तडजोड करणाऱ्याचा श्वास घुटमळू लागतो. अडचणी कोणत्या संसारात येत नाहीत पण त्या सोडविण्यासाठी जर एकच हात असेल तर तो उणा पडतो. नाती टिकविण्यासाठी आणि तीही लग्नामुळे निर्माण झालेली असतील तर बदल हा अपेक्षित असतोच पण तो फक्त घरात येणाऱ्या नवीन माणसाने स्वतःमध्ये घडवावा हि बहुतांश सासरच्या मंडळींची अपेक्षा असते. हि व्यक्ती नेहमी सुनच असते कारण आपल्याकडे घरजावई होणे ही रित अगदीच काही प्रचलित नाही. त्यामुळे टाकून दिलेला नवरा किंवा बायकोचे घर सोडून आलेला नवरा असं आपल्याकडे होत नाही. जुळवून घेता येत नाही की जुळवून  घ्यायचंच नसतं? जुळवून घेण्याची इच्छा फक्त एकालाच असावी? दोघांनाही नको? मग तो जुळवुन घेणाऱ्यावर अन्याय नाही का ठरत? लग्नाबद्दल प्रत्येकाचं मत, अनुभव वेगवेगळा असु शकतो कारण तो व्यक्तिसापेक्ष असतो.  माझ्या पहिल्या विवाहाच्या अनुभवाने मी आणि माझं कुटुंब पूर्णतः खचून गेलं होतं. त्यावेळी मी जे काही ब्लॉगवर लिहायचे त्यात फक्त आणि फक्त वेदना असायची. मनातली खदखद मोकळी करण्याचं एक साधन. मी स्वतःला गोठवून घेतलं होतं त्या आठवणींत. विभक्त होण्याच्या काळात सुद्धा आस लावुन बसले होती की काहीतरी चमत्कार घडेल आणि सगळं नीट  होईल पण वृथा अहंकार, व्यसनाधीनता, कर्जबाजारीपणा, राग,  दुःख, लाचारी ह्या सगळ्या भावनांच्या गर्तेत माझा नवरा सापडला होता. ह्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन एक सुखी समाधानी आयुष्य आपण जगू शकतो ह्यासाठी मी केलेली तगमग त्याला जाणवली नसावी. पण त्याला काय हवं आहे ह्याचा विचार त्याने नक्कीच केला असावा आणि म्हणूनच अतिशय शांतपणे घटस्फोटाचा निर्णय तो स्वीकारु शकला. कोणताही कपट भाव मनात न बाळगता मी परस्पर समंतीने घटस्फोट घेतला. त्यावेळी झालेल्या जखमा भरून निघायला काही वर्ष लागली. घटस्फोटीता असा क्रुर शिक्का माथी बसला आणि मी कोलमडून गेले. त्या दिवशी कोर्टातून मी सरळ घरी आले होते. कोणाशी एक शब्द देखील पुढचे बरेच महिने बोलले नव्हते. माझा उदास, एकाकी कुठेतरी शून्यात हरविलेला चेहरा पाहणं हि माझ्या घरच्यांसाठी शिक्षा होती. एकटेपणा मी पचविला होता पण त्यांना माझा एकटेपणा पाहवत नव्हता. माझं घरटं विस्कटून गेलं कायमचं.

कपिलामावशी  कपिलामावशी घरटा मोडून तू का जाशी?
नाही गं बाई मुळीच नाही मऊ गवत देईन तुशी
कोंबडीताई कोंबडीताई माझा घरटा पाहिलास बाई?
नाही गं बाई मुळीच नाही तुझा माझा संबंध काही
कावळेदादा कावळेदादा माझा घरटा नेलास बाबा?
नाही गं बाई चिमणुताई तुझा घरटा कोण नेई?
आता बाई पाहू कुठे? जाऊ कुठे? राहू कुठे?
गरीब बिचाऱ्या चिमणीला सगळे टपले छळण्याला

सुनेला मुलगी मानणारे खूप कमी लोक ह्या जगात असतील. सासरी राहून सतत अपमान, असुरक्षिततेची भावना घेऊन अगतिक आयुष्य जगण्यापेक्षा मला माझा आत्मसन्मान महत्वाचा वाटला. 'समाज काय म्हणेल' हा एक खोटा बागुलबुवा आहे हे मला तो उंबरठा पार केल्यावरच समजलं. हे असं का झालं ह्याच उत्तर कोणाकडेच नव्हतं.

चिमणीला मग पोपट बोले, का गं तुझे डोळे ओले?
काय सांगू बाबा तुला, घरटा माझा कोणी नेला?
चिऊताई चिऊताई, माझ्या घरट्यात येतेस बाई?
पिंजरा किती छान माझा, सगळा शीण जाई तुझा
जळो तुझा पिंजरा मेला, त्याचे नाव नको मला
राहीन मी घरट्याविना, चिमणी उडून गेली राना

ह्या रानात उडून गेलेल्या चिमणीला काही वर्ष इथे तिथे आसरा शोधावा लागला. शेवटी रानच ते. तिथे सुरक्षितता कुठली? चिमणी जीव मुठीत घेऊन इतर चिमण्यांच्या घरट्यात रहायची. पण तिचं स्वतःचं घरटं बांधायला तिला जमत नव्हतं. तिचा बराचसा वेळ आपलं घरटं कसं मोडलं ह्याच विचारात जाई. विभक्त झालेल्या स्त्रीला आधार (?) द्यायला बरेच खांदे पुढे येतात. माझ्याही आयुष्यात तसे आले पण त्यातील फोलपणा वेळीच समजला आणि मी स्वतःला सावरलं. माणूस आपल्या भुतकाळा इतकं इतर कशालाही भीत नाही पण मी ती भीती पार ठेचून काढली आहे. माझ्या वेदना, माझं  दुःख, माझं आजारपण ह्या सगळ्यांना मात देऊन मी साधारण आयुष्य जगू लागले. एका सुंदर नात्याचा (अर्थात फक्त मलाच सुंदर वाटणाऱ्या)मृत्यु मी पचविला.

पाऊस आला की आधीच सारं काही वाहून जातं. तो येतो तेच हिरवाईचं स्वप्न लेवून. माणसाच्या मनाचं सुद्धा असंच काहीतरी असावं.  कळी एकदाच उमलते पण माझ्या आयुष्याची कळी पुन्हा एकदा उमलली आणि हि जादु घडली आयुष्यात पुन्हा लाभलेल्या समजूतदार जोडीदारामुळे. आज मी हे सारे लिहू शकले कारण मला साथ मिळाली एका प्रगल्भ जीवनसाथीची. मनुच्या येण्याने मागे साचून राहिलेलं सारं किल्मिष वाहून गेलं. माझा पुनर्विवाह तर त्याचा पहिला. माझ्या घटस्फोटाची मलिन बाजु पूर्णपणे बाजूला सारून एक माणूस म्हणून माझा पत्नीरूपात स्वीकार करणारा, एक व्यक्ती म्हणून माझ्या स्वातंत्र्याला जपणारा मनु माझा देव आहे. हो मी देवासारखा म्हंटलं नाही, देव म्हंटलं आहे. अतिशयोक्ती वाटली ना? आमचे धर्म वेगळे, संस्कार वेगळे, भाषा वेगळ्या आहेत. सामान्यतः माणुस ज्या धर्मात जन्माला येतो त्याचं लेबल त्याला लावलं जातं. ज्या देवासमोर त्याला नमस्कार, प्रार्थना करायला शिकविलं जातं तो त्याचा देव होतो जन्मभरासाठी. अनाथ मुलांचा कोणता धर्म असतो? ती सुद्धा माणसंचं ना? ज्या धर्मात जन्माला आलो त्या धर्माचं लेबल आम्हाला जन्मापासून जोडलं गेलं. नु पुर्णतः नास्तिक पण तरीही इतर धर्माविषयी आदर राखणारा. तो कोणत्याही देवाची पूजा करीत नाही पण ह्या सर्व विश्वाला नियंत्रित करणारी एक अगम्य शक्ती आहे ह्यावर त्याचा दृढ विश्वास आहे. त्या शक्तीचं पूजनीय सोयीस्कर माध्यम म्हणजेच वेगवेगळ्या धर्माचे देव असं मानणारा. त्याचा धर्म म्हणजे माणुसकी. माणसांच्या इतर धर्माविषयी त्याचं मत म्हणजे कोणत्याही माणसाने स्वतःच्या धर्माविषयी किंवा जातीविषयी वृथा अभिमान बाळगू नये आणि दुसऱ्याच्या धर्माचा अथवा जातीचा अनादरही करु नये. आम्ही लग्न आणि धर्म ह्या दोन्ही गोष्टींना एकाच धाग्यात बांधून ठेवलं नाही. दोन माणसांमधील नात्याला फुलण्यासाठी काय आवश्यक आहे ते गेल्या वर्षभरात हळूहळू समजत गेलं. थोडी थोडकी नाही तर खूप काळजी, खोलवर रूजलेला समजूतदारपणा आणि एकमेकांवरच्या विश्वासाची भली मोठी बोचकी उचलण्याची ताकद. मग प्रेम नावाचं रोपटं आपोआपच तिथे फुलायला लागतं. बरं हे सगळं असं चुटकी वाजवून घडतं असंही नाहीये. पती-पत्नीच्या नात्यात शरीर सुख हेच सारं काही नसतं. त्यासाठी महत्वाचा असतो एकमेकांतील संवाद आणि त्याहीपलीकडे जाऊन आत्मसात होणारी नजरेची भाषा.

हल्ली मी कोणत्याही गोष्टीवर पटकन व्यक्त होणं बंद केलं आहे.  त्यामुळे लिहिणंही ओघाने कमी झालं आहे. माझा परीघ मी अगदी आखून रेखून ठेवला आहे. नात्यांची नाही तर माणसांची भीती मनात कायमचं घर करून राहिली आहे. मी, मनु, आम्हां दोघांचे आई-वडील, बहीण, भाऊ आणि दोन चार मित्र-मैत्रिणी एवढाच काय तो माझा परीघ. ह्या परिघाच्या बाहेर मी मनुच्या मदतीने पाऊल टाकण्याचा प्रयत्न करते आहे. उरलं सुरलं पागोळ्यांतून वाहून जाईलच. 

Monday, November 7, 2016

अधांतरी

आयुष्यात खूप काही गोष्टी करायच्या असतात. योग्य वेळी त्या करू अशी आपणच आपली समजूत घालतो; पण ती योग्य वेळ कधीच येत नाही. हळूहळू जाणीव होते आयुष्य हातून निसटून जाण्याची जशी गच्च मुठीतून वाळू सरकून जाते. प्रत्येक दिवस संपताना आयुष्य संपून गेल्याची चाहूल लागते. आठवणीतील माणसं आठवत राहतात. रक्ताच्या नात्यांपेक्षाही वेगळी, नावं नसलेली पण मनाने जोडलेली आतल्या आत जपलेली अनेक नाती आठवत राहातात. त्यातलंच एक नातं आहे. अंधारलेलं... विझून गेलेलं... कधी काळी टवटवीत आणि निरागस असलेलं. आता मात्र सगळंच असंबध्द... अनाकलनीय. त्या नात्याला नव्हतं कधी कसलं कुंपण.  ना वयाचं... ना अंतराचं...  ना संवादाचं. बांधिलकी होती ती फक्त विश्वासाची... प्रामाणिकपणाची. कधी कधी त्या नात्यावर चढलेली काजळी पुसून त्याला पुन्हा लखलखीत करावं असं वाटतं; पण काळाच्या ओघात ते नातं रुतून बसलं आहे घट्ट संशयाच्या चिखलात. प्रयत्न फक्त एका बाजूनेच का होतो आहे? दुसऱ्या बाजूलाही तसचं वाटतं असेल का? पण कळणार कसं? त्यासाठी माखवून घ्यायला हवं स्वतःला त्या चिखलात. शक्य आहे आता? झेपेल आपल्याला आता हे सगळं? त्या नात्याला मोकळं करायचा प्रयत्न केला की अजूनच रुतायला होतं आणि मग सुरु होते तगमग त्या चिखलातून बाहेर पडण्याची. डोळे मिटले जातात गच्च. काळ फिरवू लागतो त्याची चक्र उलट्या दिशेने. हळूहळू एक एक गोफ विणला जातो... निस्पृह. पापण्यांवर पुन्हा बांधली जातात कोवळ्या वयातली स्वप्नांची तोरणं आणि पाणावले जातात डोळे. ते नातं कधी फुलवायचं गालावरची खळी तर कधी पुसायचं गालांवर ओघळणारे अश्रू. त्या नात्याला माहीत नव्हता जगण्यासाठी लागणारा पैशांचा ऑक्सिजन.  कुठल्यातरी अनामिक ओढीने त्या नात्याच्या गाठी एकमेकांत गुंतल्या गेल्या. मासा बनून आकाशात उडायचं की पंख लावून समुद्रात डुंबायचं? निळ्या फुलपाखरांच्या रानात बागडताना काळ्या सुरवंटाचे काटे रुततात. पुन्हा तसेच घट्ट. चिखल आणि काटे... एकाच नाण्याच्या दोन बाजू. श्वास दोन्हीकडे घुसमटतो. डोळे उघडतात तोपर्यंत खूपच उशीर झालेला असतो. चिखल बरबटू लागतो पायाला. जीवाच्या आकांताने पाय उचलले जातात पण ते नातं परतु देत नाही किनाऱ्याकडे पुन्हा. हाती उरलेलं असतं सत्य. भीती वाटते. चिखलाच्या खुणा किनाऱ्याच्या स्वच्छ वाळूवर उमटल्या तर? दोलायमान झालेल्या मेंदूत विचारांचा भुगा होतो. एकटं असलं की विचारांचं वटवाघुळ मोठं होत जातं आणि सारं आकाश व्यापून टाकतं. सुरवातच झाली पानगळीच्या ऋतुने म्हणून सारी पाने गळून गेली का? ग्रीष्माच्या चटक्यांनी जळून कोळसा झालेलं मन. पावसाचा ऋतु आला आणि मागे राहिलेलं बाकी सारं वाहून गेलं. ऋतूंचं आस्तित्व संपलं तसं चक्र सुरू झालं पहाट आणि रात्रीच्या गुंत्याचं. रात्र घेऊन येते हरवलेल्या आठवणी आणि पहाटेला समोर उभं राहतं उघडं नागडं वास्तव. माणूस नेहमी दुःखालाच गोंजारत बसतो पण इथे तर चक्क लाथाडलं गेलं दुःखाला. वेदनेची दोन रूपं आयुष्याने दाखविली. पहिल्या रूपाने मुळासकट कोलमडून पाडलं. तुटून मोडून गेलं सारं. दुसरं रूप ज्याने मुळापासून बदलून टाकलं. आयुष्याकडून ढीगभर अपेक्षा ठेवल्या आणि शेवटी जगू दे काही क्षण मला म्हणण्याइतपत अगतिकता वाट्याला आली. खंबीर असणं म्हणजे नेमकं काय? आपल्या वेदना आपले अश्रु आपली दुःखं जगापासून लपवून चेहरा सतत हसरा ठेवणं? आनंदी असण्याचा, सुखात असण्याचा दिखावा करणं? जो स्वतःच्या दुःखाला, वेदनेला समजून घेतो आणि जगासमोर स्वीकारतो तो खरा खंबीर माणूस. शब्द विरून जातात क्षणभरांत; पण स्पर्शाच्या गंधाळलेल्या खुणा जपल्या जातात. भावनांना नेहमीच शब्दांच्या कोंदणात बसवायचं नसतं. नाजूक वेळी आपण नको ते शब्द वापरून त्या भावनांचा अवमान करत असतो. शब्दांचा खेळ खेळून झाल्यावर निशब्द व्हायला होतं. नको वाटू लागते शब्दांचे अरण्य. निशब्दता किती सुंदर आहे. फक्त मखमली स्पर्श सांभाळायचे हृदयात. हे स्पर्श जगायचे असतात शब्दांचे वादळ न उठवता. नाव नसलेली नाती शिकवितात असंही जगायला. हे नातं आहे पहाटेच्या स्वप्नाचं… डोळे उघडले की आस्तित्व नसणारं. कोवळ्या उन्हाचं… सूर्य डोक्यावर आला की करपून जाणारं. अळवावरील दवबिंदुचं…म्हंटलं तर जपायचं नाहीतर वाऱ्यावर भिरभिरायचं… अधांतरी.

Thursday, July 7, 2016

मृत्युनंतरचं जगणं

पावसाळ्यातलं हिल स्टेशन भासणाऱ्या आमच्या घराच्या गॅलरीत काल संध्याकाळी मी काही पाऊस थेंब झेलत बसले होते. आईने दिलेला अळू कुंडीत अगदी भला थोरला होऊन डवरला होता. त्याचं एक पान हाताने जवळ करून मी गालाला लावून पाहिलं. त्यावेळी जे वाटलं ते शब्दात मांडणं कठीण. ह्या अळूचे कांदे आईने काही वर्षांपूर्वी तिच्या माहेरच्या घराच्या परसावनातून आणले होते. तिच्या आईची आणि माझ्या आजीची आठवण म्हणून. इतर कोणत्याही अळूची वडी केली तरी त्याची चव आणि ह्या अळुच्या वडीची चव नेहमीच वेगळी लागायची आम्हाला. आईच्या घरी रिपेअरिंगचं काम निघालं आणि त्यांची रवानगी माझ्या गॅलरीतल्या बागेत झाली. मनु खूप प्रेमाने काळजी घेऊन त्याला वाढवत होता. काही दिवसांनी त्याची वडी करून खाता येणार असं मी मनुला हल्ली रोजच सांगत होते. तेवढ्यात पाठीमागून मनुचा आवाज कानावर आला.  "Meera, if given a choice which tree would you like to become?" मी एका झटक्यात मागे वळून म्हंटलं. "what a beautiful idea. I would love to be cherry blossom tree... ummm... no no...  wisteria tree... थांब...  मला वाटतं मी गुलमोहर व्हावं का? " आणि मला आवडणाऱ्या झाडांच्या गर्दीत मी हरवून गेले. पण असं एकच झाड कसं निवडू? मला तर भरपूर झाडं आवडतात. खरं तर छोटासा पक्षी होऊन झाडाच्या शेंड्यावर बसून सगळं अवकाश त्या इवल्याश्या नजरेने टुकटुक बघायला काय मज्जा येईल अशा कल्पनेत रमणारी मी. काही वर्षांपूर्वी "Twilight" नावाचा एक हॉलीवूडचा सिनेमा आला होता त्यात काही अंशी हे दिवास्वप्न पडदयावर घडताना पाहिलं होतं. त्यातील बेला जेव्हा एडवर्डच्या घरी पहिल्यांदा जाते तेव्हा तो तिला पाठीवर बसवून पाईन वृक्षांच्या जंगलात हवेत उडत घेऊन जातो आणि झाडांच्या शेंड्यांवर नेऊन बसवतो. अर्थात तो अनुभव मी फक्त स्वप्नातच घेऊ शकते. पण इथे तर स्वतःच झाड होऊन जगायचं... आहा... काय अप्रतिम कल्पना. मी भुवया उंचावून मनुला म्हंटलं, "अरे पण कधी आणि कशी मिळणार मला ही संधी?" मनुने प्रश्नाचा पुढील भाग विचारताच मात्र मी एकदम गप्प झाले आणि गोंधळून त्याच्याकडे पाहू लागले. "मृत्यूनंतर तुला कोणतं झाड बनून जगायला आवडेल?"

मृत्युनंतर जीवन कसं असू शकतं?  मृत्यु हेच शाश्वत सत्य आहे आणि तरीही आपण त्याविषयी बोलणं... चर्चा करणं टाळतो. मृत्युविषयी वाच्यता करणे देखील अभद्र मानले जाते. मृत्युनंतर काय असेल? भल्याभल्यांना कोड्यात टाकणारा प्रश्न. प्रत्येक धर्माने त्यांच्या समजुतीनुसार, श्रद्धेनुसार त्यावर विवेचन केलं आहे. ह्या विषयावर खूप पुस्तकंही लिहीली गेली आहेत. इंटरनेटवर तर भरमसाठ ब्लॉग्स आणि चर्चा उपलब्ध आहेत अशा संदर्भात. माझ्या विचारांच्या गुंत्यातून बाहेर पडत प्रश्नार्थक मुद्रेने मी मनुकडे पाहिले. मनू सांगू लागला "Yes my dear. There is a life after death. इटलीमधील ऍना चितेली आणि राउल ब्रेटझील या दोघांनी पर्यावरणाला मध्यवर्ती ठेवून एका भन्नाट कल्पनेची मांडणी केली आहे. "कॅप्सुला मुंडी' असं नाव आहे त्यांच्या प्रकल्पाचं." आणि त्याने मला त्यांची वेबसाईट दाखविली.

पाश्चिमात्य संस्कृतीनुसार मृत्युनंतर माणसाचा देह लाकडाच्या कॉफीन (शवपेटिका) मध्ये ठेवून मग जमिनीत दफन केला जातो. कॉफीन बनविण्यासाठी जेवढी वृक्षतोड केली जाते ती कुठेतरी कमी व्हायला हवी किंवा थांबायला हवी असं त्या दोघांना वाटतं. व्यवसायाने डिझायनर असणाऱ्या या दुकलीने लाकडी कॉफीनला पर्यायी असा बायोडिग्रेडेबल (निसर्गात सामावून जाणारा) पॉड डिझाईन केला आहे. नैसर्गिक पदार्थांपासून बनलेला अंड्याच्या आकाराचा हा पॉड आपल्याला पुन्हा निसर्गाकडे नेण्याचा सोपा आणि साधा मार्ग आहे. ह्या पॉडमध्ये मृत शरीर अशा रीतीने ठेवतात जसं बाळ आपल्या आईच्या गर्भात असतं. हा पॉड मग एखाद्या बी सारखा जमिनीमध्ये पुरला जातो आणि त्यावर मृत माणसाच्या इच्छेनुसार त्याच्या आवडीचं झाड लावलं जातं. त्या झाडाची काळजी त्याचे आप्त स्वकीय घेतात. सहसा दफनभूमी मध्ये मृत देहाला पुरल्यानंतर त्यावर सिमेंटचा चबुतरा बांधला जातो पण जर असे पॉड लावले तर दफनभूमीचा चेहरा मोहराच बदलून जाईल. हिरवीगार झाडं आणि त्यामध्ये चिरनिद्रा घेत पहुडलेली आपलीच माणसं. धर्म आणि संस्कृतीची कुंपणं ओलांडून त्यांनी हा विचार केला आहे.

झाडं, पशु-पक्षी, मनुष्य प्राणी हे या पृथ्वीचाच अविभाज्य भाग आहेत. जैविक साखळी नैसर्गिक समतोल राखण्यास मदत करते. सध्या जी भयानक वृक्षतोड चालू आहे त्यामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळतो आहे. वृक्ष कापले जातात पण तेवढेच  पुन्हा लावले जात नाहीत. त्यामुळे कुठे अतिवृष्टी तर कुठे दुष्काळ. जंगलांचं प्रमाण कमी झाल्यामुळे नको तितकी उष्णता वाढली आहे. प्रदूषणामुळे सगळ्या तत्वांचं संतुलन बिघडत चाललं आहे आणि त्याचा परिणाम इतर जीवांबरोबर मनुष्य प्राण्यांवरही होतो आहे. सृष्टीप्रमाणे मनुष्याचं शरीर हे देखील पंचमहाभुतांचं (पृथ्वी-भूमी, आप-जल, तेज-अग्नी, वायू-वारा आणि आकाश) बनलेलं आहे आणि मृत्युनंतर ते पुन्हा पंचतत्वात विलीन होणं अपेक्षित आहे. आपल्याकडे भारंभार धर्म असले तरी प्रामुख्याने दहन आणि दफन ह्या दोन पद्धती अस्तित्वात आढळतात. दहन प्रकारात मृतदेहाचे दहन विद्युत दाहिनीत केले जाते किंवा त्यावर अग्निसंस्कार केला जातो पण अग्निसंस्काराला खूप लाकूड लागते. दफन करण्याच्या पद्धतीत धर्मानुसार थोडाफार फरक आढळतो. मुस्लिम आणि ज्यु धर्मात मृतदेहाला कापडात गुंडाळून मग जमिनीत पुरले जाते तर ख्रिश्चन धर्मात लाकडी पेटीत ठेवून दफन केले जाते. लिंगायत समाजामध्येही मृत शरीराचे दफन करण्याची प्रथा आहे. इथेही पुन्हा जागा आणि लाकूड हे प्रश्न आहेतच. उत्तर भारतात मृतदेह गंगेत सोडून देण्याचीही प्रथा आहे. पारशी धर्मात मृतदेह गिधाडांना खाण्यासाठी विहिरीत ठेऊन देतात. मृतदेह हा इतर जीवांना अन्न म्हणून मिळावा असा उद्देश असावा. काहीजण आपापल्या कुवतीनुसार आणि धर्माच्या शिकवणीनुसार पाप पुण्याचा हिशोब करून जगतात आणि ठरवतात मृत्यूनंतर त्यांना स्वर्गात जायचं आहे की नरकात. ज्यांचा अशा गोष्टींवर विश्वास नाही ते ह्या भानगडीत पडत नाहीत आणि त्यांना पटेल तसं आयुष्य जगतात. काही माणसं समर्थ रामदास स्वामींची "मरावे परी कीर्ती रूपे  उरावे" ही उक्ती तंतोतंत पाळतात तर काहीजण त्यात थोडा फेरफार करून "मरावे परी अवयव रूपे उरावे" ही उक्ती सार्थ करतात. अवयव-दानावरून आठवलं. काही महिन्यांपूर्वी 'फिर जिंदगी' हा सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकारांचा एक अतिशय तरल आणि आशयसंपन्न लघुपट माझ्या पाहण्यात आला. त्याविषयी लिहिणं हा एक स्वतंत्र विषय होऊ शकेल. मृत्यूनंतरदेखील जीवन आहे असा सुंदर संदेश त्यांनी या लघुपटाद्वारे दिला आहे. आपले अवयव एखाद्या गरजू माणसाला दान करणं हा निर्णय आपण जिवंतपणी घेऊ शकतो पण ह्या लघुपटात दाखविल्याप्रमाणे आपण मृत्यूच्या शय्येवर असताना आपले आप्त सुद्धा असा निर्णय घेऊ शकतात. समाजात अजून तेवढी सहज आणि धीट मनोवृत्ती उदयास आलेली नाही. आपले डोळे, हृदय, किडनी, त्वचा, स्वादुपिंड, फुफ्फुस, यकृत असे काही अवयव इतर गरजू लोकांना नव-जीवन मिळवून देतात. अशा प्रकारची जन-जागृती करण्यास या लघुपटाने निश्चितच मोलाचं योगदान दिलं आहे. आपलं माणूस ह्या जगात कोणत्यातरी रूपात जिवंत आहे ही भावनाच किती समाधानकारक आहे. पण नुसते अवयव दान केले तरी उरलेलं शरीर पुन्हा नातेवाईकांच्या हाती येतंच. संपूर्ण देहदान हा सुद्धा एक पर्याय आहे. मृतदेहाचं काय करायचं हा ज्याच्या त्याच्या धर्माशी, इच्छेशी आणि भावनेशी निगडित असा विषय आहे. शिवाय प्रत्येक देशाचे कायदे आहेतच जोडीला.

मृत्यु हा शेवट नसून निसर्गाकडे परत जाण्याची सुरवात आहे आणि म्हणूनच मृत्युनंतर झाड होऊन पुन्हा जगण्याची कल्पना मला तरी आवडली. कोणतं झाड व्हायचं हे मात्र सध्या मोठं कोडं आहे माझ्यासमोर :)

Thursday, June 30, 2016

प्लुवियोफाईल

"मला पाहायच्या आहेत अनवट वाटा… वेडूलं होऊन. मनसोक्त भटकंती करायची आहे. कधी न पाहिलेलं, कधीही अनुभूती न घेतलेलं अनुभवायचं आहे. भरधाव वेगाने वारा कापत जाणाऱ्या गाडीत माझी आवडती गाणी ऐकत गाढ झोपायचं आहे. कोणत्याही वळणावर मला हवं तेव्हा थांबायचं आहे. हाच क्षण जगायला… हेच दृश्य पाहायला.  रस्त्यातल्या टपरीवर चहा प्यायचा आहे. निसर्गाची रूपं डोळ्यांमध्ये कैद करून ठेवायची आहेत. निशब्द राहून सूर्योदय पहायचा आहे आणि सूर्यास्ताच्या रंगात स्वतःला न्हाऊ घालायचं आहे. जंगलात दूर दूर हरवलेल्या वाटांवर माझ्या पाऊलखुणा उमटवायच्या आहेत. दाट रानात जाऊन पक्षांच्या लकेरी ऐकायच्या आहेत. धुक्याचा पाठलाग करायचा आहे… अगदी त्याच्या अंतापर्यंत. धुवांधार कोसळणाऱ्या पावसात चिंब भिजायचं आहे. फेसाळत्या धबधब्याखाली संवेदना बधीर होईपर्यंत बसायचं आहे आणि धबधब्याच्या पाण्याच्या भिंतीपाठी उभंही राहायचं आहे. उंच कड्यावरचा बेभान वारा अंगावर घायचा आहे. श्वास भरून खोलवर रोमारोमांत साठवून घ्यायचा आहे. तास न तास डोंगराच्या टोकावर बसून खोल दरी न्याहाळायची आहे. खूप गोंडस असा आठवणीचा ठेवा भरून ठेवायचा आहे. मला जगायचं आहे." मनुच्या हातात माझी लिखाणाची डायरी होती. मराठी वाचण्याचा निष्फळ पण प्रामाणिक प्रयत्न करत होता तो. हस्तलिखित त्याला आवडून गेलं… हे काहीतरी वेगळं लिहीलं आहे ह्या खात्रीने तो मला म्हणाला, "सांग काय लिहिलं आहेस" आणि मी त्याला माझी विश लिस्ट इंग्लिशमध्ये बुचकळून ऐकविली. क्षणाचाही विलंब न लावता मनुने मला माझ्या प्रत्येक इच्छापुर्तीचं अलिखित वचन दिलं जे मी सध्या  त्याच्याबरोबर जगते आहे. माझा ब्लॉग बघितल्यावर म्हणाला, "तू काय लिहिलं आहेस ते मला कळत नाहीये पण तू पोस्ट करत राहा. मी नेहमी तुला डायरी लिहिताना पाहतो. त्यावेळी तुझ्या चेहऱ्यावर जे भाव उमटतात ते शब्दातीत असतात." हल्ली डायरी लिहिणं माझ्यासाठी जास्त सोयीस्कर झालं आहे. आवाजाची पातळी उंचावण्यापेक्षा डायरीत लिहिलेले मूक शब्द बरंच काही सांगून जातात आणि नेहमी फक्त माझ्याच जवळ राहतात. वादळात हेलखावे खाणाऱ्या नावेचा तळ गाठण्याचा संभव जास्त असतो. पण मनु आला आहे माझ्या आयुष्यात एक दीपस्तंभ होऊन. आता किनाराही दूर नाही राहिला. मनु बोलत राहिला, "जेव्हा निरपेक्ष भावनेनं आपण एखादी कृती करतो आणि त्यातून कोणाचेही नुकसान न होता जर फक्त आनंद मिळत असेल तर त्यात काहीही गैर नाही. 'Do what you love'. तुझ्या ब्लॉगच्या टेम्प्लेट मधले ते पक्षी पहा कसे स्वैर उडत आहेत. त्यांना कोणतंही बंधन नाहीये. तु देखील लिहित रहा मनमोकळं."'

माझ्या बाबतीत हल्ली बऱ्याच वेळा असं घडतं आहे. काही जागा, काही माणसं, काही अनुभव आणि काही शब्द देखील असे भिडतात की त्याविषयी लिहिल्याशिवाय राहवत नाही. "प्लुवियोफाईल". असाच थेट भिडलेला शब्द. त्याचा अर्थ आहे पावसावर नितांत प्रेम करणारा ज्याला पावसात फक्त निरामय आनंद आणि मनः शांती मिळते. अगदी काही दिवसांपूर्वीच हा शब्द मला मिळाला आणि मी त्याच्या प्रेमात पडले. एका मित्राने मला व्हॉट्सअपवर मेसेज पाठवला 'I found a word for you. Pluviofile'.  असं घडणं हा केवळ एक योगायोग असावा का? कारण त्या क्षणी मी तो शब्द अक्षरशः जगत होते. मी सिंधुदुर्गातल्या देवबागेत होते. आम्ही राहात असलेल्या रिसॉर्टच्या पुढील बाजूला दूरवर पसरलेलं कर्ली नदीचं पात्र तर पाठीमागच्या बाजूस निळाशार अरबी समुद्र. बाहेर दाटलेले ढग, वाऱ्यावर झुलणारा पाऊस आणि माझ्या इअर प्लगवर बरसत होते "जाईन विचारीत रानफुला" चे स्वर.

पाऊसच का हवाहवासा वाटतो?  पहिल्या पावसात येणारा मातीचा दरवळ का वेड लावतो? पावसातलं धुकं,  विजेचा गडगडाट, संतत कोसळणारं आभाळ,  लयीत घुमणारा पाऊस-धारांचा आवाज, उधाणलेला समुद्र आणि लाटांवर थरारणारा मस्तवाल पाऊस, तळ्याकाठचा पाऊस, आठवणीतल्या गावातला पाऊस,  शाळेत जाणाऱ्या वाटेवरचा अल्लड पाऊस, रानातला निखळ निलाजरा पाऊस, डोळ्यांत न मावणाऱ्या हिरवाईच्या असंख्य छटा, पानांवरून टपटपणारे थेंब, बेधुंद करून टाकणारा गारवा, खिडकीतला पाऊस आणि पावसात न्हाऊन निघालेली प्रत्येक गोष्ट…. नक्की काय जादू करते माझ्यावर? हीच वेळ नवसर्जनाची… हीच वेळ अविष्काराची असते ना? स्वतःच्या जगात जगण्याची पुन्हा एक नवी संधी. पाऊस जगावसा वाटतो आणि मग पाऊसच शब्द होऊन लिहिला जातो. पाऊस कोसळत असतो… फक्त पाऊसवेड्यांसाठी. कोणाला नको असतो पाऊस? प्रत्येकाला समजलेला आणि प्रत्येकात रुजलेला पाऊस  वेगवेगळा असतो.  पावसात भिजायचं… पावसात रमायचं. फक्त पहिलीच नाही तर पावसाची प्रत्येक सर मला ओढ लावते. तो पडत नसला तरी त्याच्या नादाची झिम्मड नेहमीच माझ्या कानांत असते. हो... असाच जगते मी पाऊस. केव्हाही डोळे मिटले की जाणवतं मला त्याचं अस्तित्व. जेव्हा मोडून काढणाऱ्या उन्हाळ्यानंतर आभाळाची घोंगडी पांघरून तो येतो दबकत तेव्हा आकाशाचा रंग अचानक बदलू लागतो. एका पाठोपाठ एक भले मोठ्ठाले राखाडी ढग आकाशात जमू लागतात. हिरव्या बांबूची बने वाऱ्यासवे शीळ घालू लागतात. साऱ्या दिशांना कवेत घेत तो कोसळू लागतो.

माणुस म्हणे सवयीचा गुलाम असतो… एकांतात पावसाकडे बघत बसायचं ही माझी सवय माझ्याइतकीच जुनी. आभाळातला पाऊस अल्लद डोळ्यांत येऊन दाटतो. डोळ्यांतून हळूहळू मनात पाझरायला लागतो तोपर्यंत सगळं सुन्न झालेलं असतं. पावसाच्या धारांबरोबर विचारही वाहवत जातात. हरवलेले सारे क्षण आठवत. पाऊस माझ्या मनातला. कधी येतो चोरपावलांनी लाजत तर कधी घनगर्जत… धुमाकूळ घालत. मी कड्याच्या टोकावर उभी... भरारी घेण्यास पंख उत्सुक. समोर दिसत असते वीजांनी लखलखणारं क्षितिज आणि त्याचवेळी माझ्या पायांना वेटोळं घालत असतो माझा भूतकाळ. किती काळ आतल्या आत हा दुष्काळ सोसावा?  सगळ्या किंकाळ्या ओठांपाशी येऊन गुदमरून जातात. मी असून नसते अशा वेळी. एक पाठोपाठ एक जन्म घेत राहते पुन्हा पुन्हा जगण्यासाठी. त्रयस्थ बनून जगत असते मी माझ्या आतील जग. ह्या जगात माणसं येत जात राहतात.  माझ्यावर प्रेम करतात...  मला टोचून दुःखही देतात. कधी कधी सोडून दूर निघून जातात आणि मग मी बनते मला हवी तशी. कारण आयुष्य माझंच आहे... ते जगायचं कसं हे मी स्वतः निवडते... चुकाही माझ्याच... कळत नकळत मीच त्या करते. त्यातून मिळालेले धडेही माझे मीच शिकते. परिस्थितीला शरण जायचं नाही हा मंत्र नुसता जपत नाही तर अक्षरशः जगते. आयुष्यात परिस्थितीने उभ्या केलेल्या वादळांचा सामना करते... कधी कधी हरते...  असं हरणं सुद्धा नव्याने जगायला शिकवतं. दुःख हे शाश्वत नाहीच. ते जाणारच असतं आपल्याला सोडून. फक्त आपण त्याला कधी सोडणार ह्याची वाट बघत बसतं बिचारं. कधी काही क्षण... तर कधी काही दिवस... तर कधी कधी कितीतरी वर्ष ते आपण आपल्या वळचणीला साचवून ठेवतो. एकदा ते गेलं की त्याची जागा दुसऱ्या दुःखाला द्यायची की सुखाला हे पुन्हा आपल्याच हातात असतं. हे सारं गणित पावसाने समजावलं. दुःख आणि भूतकाळ, दोन्ही लाथाडण्याची ताकत मिळाली. भन्नाट टपोऱ्या ओल्यागच्च थेंबांचा पाऊस कोसळत राहतो. थुईथुई पडणाऱ्या थेंबांनी मनाबरोबर सारे रान ही लागते नाचू. रानातल्या वाटांवर मी चालत असते की त्या माझा पाठलाग करतात? निर्मनुष्य आणि म्हणूनच सुसह्य भासणाऱ्या ह्या रानवाटा माझ्या सख्या आहेत. त्या वाटांवरून चालत राहायचं... कितीतरी तास… क्षणा क्षणाने विरून जाणारा असतो वेळेचा बुरखा. म्हणूनच मी धाडस केलं पंख पसरविण्याचं. पायांना छातीशी कवटाळून भरारी घेतली फक्त समोरच्या क्षितिजाला नजरबंद करून.   जितकी उंच भरारी तेवढं नवं क्षितिज. असा हा पाऊस... हवाहवासा... वेड लावणारा. मला प्लुवियोफाईल... पाऊसवेडी करणारा.
Tuesday, March 15, 2016

अबोलीचे स्पर्श


एका हळव्या संध्याकाळी तो ओलेता होऊन दारात उभा. मी दार लावून घेतलं. पाहतो तर तो माझ्या खिडकीत. खिडक्यांची तावदानं बंद केली तर छपरातून सरळ आत शिरला. चिंब भिजवुन टाकलं मला तुझ्या प्रियसाजणाने. तेव्हा मला आठवलीस तू. काही क्षण कोरडे… काही ओलेते… पागोळ्यांमधून सांडून गेलेले. तुझ्या आठवांची चाहूल अवचित लागली आणि माझ्या खोलीतला अंधार अलगद फुलून आला. सरींवर सरी ओल्या बरसत राहिल्या छपरांवर बेधुंद. जे क्षण जगताना बेफिकीर होऊन जगलो ते इतक्या लवकर आठवणी बनतील असं वाटलं नव्हतं. आठवणी जात नाहीत. चिटकून राहतात गोचीडांसारख्या. रक्त शोषून झाल्यावर गलितगात्र करून सोडतात. काय कमावलं आणि किती गमावलं ह्याचा हिशोब करायचा नव्हताच कधी मला. मी जगतो आहे पण माझं जग मात्र ठार मेलेलं आहे. खोलीतला कोंदट अंधार त्या मेलेल्या जगाची जाणिव आणखीनच गडद करू पाहत आहे.

अश्यातच आठवू लागला मला आपल्यातला शब्देविण संवादु. शब्दांशिवाय जगण्याचं व्रत घेऊन जगत राहिलीस. सगळीच नाती जपत होतीस फुलांपरी. काही नात्यांच्या पाकळ्या गळून गेल्या… तरीही जपून ठेवायचीस तू त्यांना. मनाच्या अंधारडोहात. काय काय दडवून ठेवलं होतं तू तिथे कोणास ठाऊक. तुझ्या सगळ्या इच्छा आकांक्षांची समाधीही तिथेच असणार. मी कधी त्या तळाशी पोहचलोच नाही. नेहमीच एक अगम्य भीती माझे हात आवळून ठेवायची करकच्च. आता ती भीती माझ्या श्वासाला डिवचू लागली. न राहवून मी दारं-खिडक्या मोकळ्या केल्या. आभाळाबरोबर ओढाळ मन देखील भरून आलं. का आणि कसं माहित नाही पण ओथंबून भरलं आणि वाहू लागलं.

मी तसंच दाराबाहेर पाऊल टाकलं अनवाणी. वर आभाळातून चंदेरी थेंबांची यात्रा निघाली आहे आणि आता तू सुद्धा त्यातलीच एक. कुठे घेऊन जात आहेस गं ही यात्रा? माझी पाऊलंही निघाली तुझ्या साथीने थेंबांचे गाणं गुणगुणत. तुझा स्पर्श अंगोपांगी अनुभवत. पूर्वी तूही अशीच निघायचीस धुकाळलेल्या वाटांवर… गुलमोहराला शोधत. ओला सुगंध आणि भिरभिरणारा वारा अंगावर मिरवत. मी तुझ्या सोबत असावं… तुझा जुनाच हट्ट. गुलमोहर दिसला की धावत त्याच्या मिठीत शिरायचीस. भानावर आलीस की हातांची खुण करून म्हणायचीस… अल्लद मिटायचं आहे मला तुझ्या मिठीत. अश्या कितीतरी ओल्या क्षणांना फक्त आठवत राहणं उरलं आहे माझ्याकडे. विहारायचं होतं तुला स्वच्छंद आणि मी मात्र तुला कुंपण घालत राहिलो. का? काहीच आकलत नाहीये मला आजही तुला असं पाहताना. आठवणींचा ओला दमट पाचोळा पसरलेला…सर्वदूर. कितीतरी वेळ चालत  राहिलो मी त्यावर. शेवटी दृष्टीस पडला माझ्या तो. तुझा गुलमोहर… निष्पर्ण.  त्याच्या प्रत्यके फांदीवर  जाणवू लागलं मला तुझं अस्तित्व. ह्याचसाठी केला होतास का गं सारा अट्टहास?


तू होतीस माझ्यासोबत… सावलीसारखी. पण तेव्हाही मी तुला एकटेपणाची जाणीव देत राहिलो. निघून जाण्यातही एक शहाणपण असतं. ते मात्र तू पुरेपूर निभावलंस. मी शोधत राहिलो तुझी सावली. कधीतरी ऐकलं… तू डोळे मिटले. त्या रात्री डोळ्यांच्या खोबणीत उतरली होती भिजलेली रात्र. पापण्यांवर विसावलेले काजवे किर्रकिर्र करत उडून गेले. मग कितीतरी रात्री पापण्या मिटल्याच नाहीत. हळूहळू मला उमजलं, वेदनेचा लपून राहिलेला झाकोळ तिथून पाझरतो आणि सांगतो की तू आहेस… इथेच… माझ्या सभोवताली. मला हवी आहेस तू  पुन्हा… आणि म्हणूनच मला भेटणार आहेस तू पुन्हा… ओल्याचिंब रानात, नदीच्या झुळझुळणाऱ्या पाण्यात, गवताच्या पातीवर, फुलांच्या कोषात. हो ना? जशी आज मला भेटलीस तू चंदेरी थेंबांत. तुला ठाऊक आहे? दोन साळुंख्या आजही येतात आपल्या अंगणात. सवयीने दोन बोटं ओठांपर्यंत जातात. पण मी ओठांना त्यांचा स्पर्श होऊ देत नाही. त्या ओठांवर रेंगाळून राहिले आहेत तुझे नि:श्वास. भीती वाटते. उगाच खुणा पुसल्या गेल्या तर?  आठवणींनाही गंध असतो का ग? आणि वेदनेला? आठवणी आणि वेदना… जुळ्या असाव्यात बहुधा. कधीही येतात आणि झोडपून काढतात मला उभं आडवं. खेळवत राहतात मला सुखदुःखाच्या अल्याडपल्याड. मीही झोकून देतो स्वतःला त्यांच्यासोबत. लोकं म्हणतात, वाऱ्यावरचं जगणं जगतो आहे बिचारा… तिच्याशिवाय. मी मात्र धुंदावत जातो अबोल स्पर्शांच्या मैफिलीत…तुझ्यासवे.

Thursday, February 18, 2016

चाफा बोलेना

कितीतरी वेळ ती तशीच पडून होती. दुपारी ऊन येतं म्हणून तिने बाल्कनीचा दरवाजा आणि पडदे दोन्ही लावून घेतले होते पण आता तिला कोंडल्यासारखं वाटत होतं. पुढच्याच क्षणी उठून तिने चेहऱ्यावर थंड पाण्याचे हबकारे मारले आणि ती बाल्कनीत येऊन उभी राहिली. पश्चिमेच्या गार वाऱ्याची झुळूक अंगावरून जाताच ती शहारली. फेब्रुवारी आला तरी थंडी आपलं आस्तित्व राखून होती. सूर्य अस्ताला जात होता आणि त्या सोनेरी प्रकाशात तिने कुंड्यांतून लावलेली फुलझाडे न्हाऊन निघाली होती. निळी, जांभळी, गर्द लाल, गुलाबी आणि श्वेत रंगातली सदाफुली वाऱ्याबरोबर डुलत होती. बाल्कनीच्या कडेने पसरलेली मधुमालती आपले गच्च फुलांचे झुबके हलवून त्यांना अधून मधून साथ देत होती. थोडं वाकून तिने कोपऱ्यावरील वळणाकडे नजर टाकली. तिथला कदंबदेखील पानांची सळसळ करून सायंकाळच्या मैफिलीत सामील झाला होता. कदंबाकडे जाणाऱ्या छोट्या पायवाटेवर दोन्ही बाजूने तिने आणि आजीने मिळून फुलझाडांची अक्खी नगरी वसवली होती. गुलाब, अनंत, तगर, जाई-जुई, सोनटक्का, मोगरा, मदनबाण, रातराणी, बकुळ, केवडा, जास्वंद, शेवंती, अबोली आणि कितीतरी वेगवेगळ्या प्रकारची चाफ्याची झाडं. त्यातला चाफा तिच्या खास आवडीचा. सोन चाफा, देव चाफा, नाग चाफा, कवठी चाफा, भुई चाफा असे कित्येक प्रकार त्या दोघींनी लावले होते. रंगीबेरंगी फुलांची उधळण करणाऱ्या बागेचं रुपडं ती नेहमीच न्याहाळत बसायची. चाफ्याच्या झाडांपाशी बसुन तर तिचं तासनतास हितगूज चालत असे. "कोणी दिला रे तुला हा मृदूगंध? कधी संपत कसा नाही तो?" असे प्रश्न ती चाफ्याला सतत विचारायची. लहानपणी ती आणि आजी रोज संध्याकाळी कदंबाखाली असलेल्या मोठ्या दगडीवर येऊन बसत. तिथून नदीच्या पलीकडचा सूर्यास्त पाहता यायचा. आईबाबांचा चेहरा तिला आठवत देखील नाही. समजायला लागल्यापासून तिला फक्त आजीचाच चेहरा दिसला होता. "झाडांना फुलं कशी येतात? कोण त्यांना एवढा छान छान सुगंध देतं?" तिचे प्रश्न. मग आजी तिला फुलांच्या गोष्टी सांगायची. "प्रत्येक फुल कळीच्या रूपात जन्माला येतं. त्याला निसर्गरूपी देव सांभाळतो. देवाने प्रत्येक फुलझाडाला वेगवेगळ्या गंधाचं लेणं दिलं आहे आणि देवाला देखील फुलं खूप आवडतात." ती आजीला विचारायची, "आज्जी, आईबाबा कसे असतात गं? माझे आईबाबा मला कधी भेटतील? कुठे असतात ते? कधी येणार? की येणारच नाहीत?" आजी तिच्या निरागस नजरेतलं प्रश्नचिन्ह पाहायची. त्या नजरेतला सत्य जाणून घेण्याचा दर्प आजीला स्पष्टपणे जाणवायचा. तरीही आजी गप्प राहायची.  पुन्हा तिचे प्रश्न तयार असायचे. "लहान मुलांना पण देव जन्माला घालतो? त्यांची काळजी घेतो?" आजी फक्त मान डोलवायची आणि मग कदंबावर राहणाऱ्या पाखरांच्या गोष्टी सांगयची. "पाखरं दिवसभर आकाशी भरारी घेत फिरतात. दूर दूर जातात. अंधार होण्याआधी मात्र ती आपल्या घरट्यात परततात. कारण घरट्याची अदृश्य वीण त्यांना एकमेकांशी बांधून ठेवते. पुन्हा परतण्यासाठी." फुलांच्या, गंधाच्या, पाखरांच्या गुजगोष्टी आजीबरोबर करत ती लहानाची मोठी झाली. आजीने सांगितलेल्या सगळ्या गोष्टी तिने कानांत आणि मनातही साठवून ठेवल्या.


पाखरं अंधारल्यावर त्यांच्या घरट्यात परत येतात. आपलं घर सुद्धा एक घरटंच आहे मग आईबाबा ह्या घरी का परत येत नाहीत? देवाला फुलं आवडतात असं आजीच म्हणायची. मग त्याने आजीला का बोलावून घेतलं असेल? तिच्या डोक्यात प्रश्नांचं मोहोळ उठलं. पण आजीने सांगितलेली वीण अदृश्य होती. कशी दिसणार ती तिला? तेवढ्यात अचानक वाऱ्याने वाहून आणलेला एक बेधुंद सुगंध तिला उभ्या उभ्या खुणावू लागला. तिच्या ओळखीचा. तिला वेडं करणारा. घराचा दरवाजा उघडून, अंगण ओलांडून ती कदंबाकडेच्या दिशने पळत सुटली. प्रत्येक पावलागणिक त्या गंधाची जादू तिच्यावर गारुड करत होती. संधीप्रकाशात तिने कदंबाला पहिले. त्याच्या फांद्यांवर पाखरं हारीने बसली होती पण सगळी चिडीचुप्प. त्याशेजारी उभा…निशब्द प्राजक्त आणि त्याच्या सभोवती सजलेला नाजूक फुलांचा सुकलेला गालिचा. मधूनच येणारी वाऱ्याची झुळुक त्यांत आणखी फुलांची भर घालत होती. इथेच फुलले होते चांदणे कधीकाळी. आत्ताही काही चांदण्या लपल्या आहेत का त्या सुक्या पाकळ्यांखाली? तिने गालिच्यावर पाय ठेवला मात्र तिला असंख्य काटे टोचले. वेदनेने तिच्या डोळ्यांत पाणी दाटून आलं. ती तर फुलं वेचायला निघाली होती मग हे काटे कसे आले तिच्या वाट्याला? फुलांच्या जगात बागडणारी ती पायात काटे रुतल्यामुळे भयभीत झाली होती.

खरं तर तिला दिसला होता एक आशेचा किरण. ज्याचे कवडसे झेलत ती निघाली होती आपल्याच नादात. कधीही सूर्योदय न होऊ शकणाऱ्या तिच्या क्षितिजावर अचानक उगवलेला तो एक तेजस्वी तारा होता. तो तिचा सुर्य होऊ शकत नाही ह्याची जाणिव त्या दोघांनाही होती. त्यांच्या सीमित अशा कक्षा होत्या ज्या त्यांनी कधीच ओलांडणे शक्य नव्हते. पण तरीही तो फिरत राहिला तिच्या नशिबाच्या कक्षेत… अधांतरी. तिला पुरेल एवढी ऊब त्याने देली. त्याच्या साथीने तिने धाडस केलं उंबऱ्याबाहेर निघण्याचं. अनेक वाटा पायाखाली घातल्या… अनवट… अनोळखी… कधी कधी अंधारलेल्या देखील. मैत्रीच्या पावलांनी अलगद येऊन, भिनवून टाकलं त्याने तिचं सारं आयुष्य. मैत्रीच्या कळ्यांचं रुपांतर प्रेमाच्या फुलांत कधी झालं हे त्या दोघांनाही उमगलं नाही. एके दिवशी त्याने तिला प्राजक्ताचं एक रोपटं आणून दिलं. ते नवीन रोप तिने कदंबाच्या शेजारी लावलं. त्याला गोंजारून सांगितलं. "आता तू माझा आहेस. या बागेत तू हवा तसा बहर… आनंदाने…आणि तुझ्या सुगंधाचे वेड लाव… माझ्याबरोबर इतरांनाही." बागेतली चाफ्याची झाडं मूक होऊन पाहात राहीली प्राजक्ताचं त्या बागेतलं रुजणं आणि त्याचं तिच्या आयुष्यात. त्याने तिला एका गोजिऱ्या घरट्याचं स्वप्न दाखवलं. तिला दिसू लागली होती घरट्याची वीण. संध्याकाळी परतण्यासाठी.

एका कातरवेळी… तो आला कदंबाखाली…तिला भेटण्यासाठी. त्याच्या येण्याने प्राजक्तही बहरला. आकाशात अजूनही सुर्यास्ताचे काही रंग सांडले होते. त्या रंगात न्हालेली ती. तिच्या केसांत त्याने माळली प्राजक्ताची काही फुले आणि तिच्या कंबरेवर त्याने मांडल्या काही नाजूक कळ्या. ह्याच छोट्या परिघाच्या आसपास फिरत असतात सगळ्या तरुण इच्छा. इच्छा… तिलाही होत्या. त्या इच्छांना पंख फुटले तेव्हा ती तरंगत राहिली स्वतःच्या मर्जीनुसार. पहाटेला सगळ्या कळ्या उमलत गेल्या तिच्या प्रत्येक भरारी बरोबर. चाफा मूकपणे पाहात राहीला प्राजक्ताची झूल आणि त्याचं बेभान बरसणं… तिच्यावर. त्या रात्री चाफा खूप रडला. चाफ्याचे अश्रू तिला मात्र दिसले नाहीत. कधीतरी … तिनेही हळूच काढून ठेवला सभ्यतचा बुरखा… निलाजरेपणे आणि त्याला विचारले, "मी कुठे फुलं माळली तर तुला आवडेल?" का म्हणून तमा बाळगायची तिने? केवळ ती एक स्त्री आहे म्हणून? स्त्री असण्याआधीही ती आहे एक माणुस. तिला संवेदनशील असं मन आहे. त्या मनालाही एक गंध आहे… तिचा स्वतःचा असा. त्या गंधाला जर त्याच्या गंधाचे वेड लागले तर दोष कुणाचा? तिच्या स्त्री असण्याचा की तिच्या संवेदनशील मनाचा? प्राजक्ताच्या धुंद गंधाचं तिला वेड लागलं… की त्याने तिला ते लावलं?  प्राजक्त मात्र प्रत्येक पहाटेला नव्याने बहरत होता. पाखरंही पाहत होती प्राजक्ताचं फुलणं. कितीतरी रात्री त्या फुलवाटेवर तिला मिळत गेली फक्त त्याच्या आवडीची प्राजक्ताची फुलं. जमा करत गेली ती एक एक फुल तिच्या परडीमध्ये. हे पाहताना चाफ्याचे अश्रू सुकून गेले. त्याची पाने गळून गेली. चाफ्याच्या झाडावर काटे फुलू लागले… कोणालाही न दिसणारे. चाफा बोलेनासा झाला.

आणि एके दिवशी तो तारा निखळून पडला. का? हे तिला कधी कळेलच नाही. त्याला निखळताना तिने फक्त पाहिला. घरटं स्वप्नातच राहिलं. तळहातावर प्राजक्ताची फुलं घेऊन पहाटेची ती धुंदी तिला पुन्हा अनुभवता येणार नाही. अजूनही सूर्यास्त झाला की ती कदंबाच्या झाडाखाली दगडीवर का जाऊन बसते? कदंबावरची पाखरं तिच्याकडे बघून कुत्सित हसतात का? रात्रभर प्राजक्ताची मनधरणी करूनही तो फुलत नाही. पहाटेला तिचा डोळा लागला की तो मुक्त उधळण करीत राहतो आणि ती भानावर येईपर्यंत तिथे पुन्हा काटे पसरलेले असतात. तिच्या खास आवडीचा चाफा तिच्याशी बोलत नाहीये. का? ह्याचं उत्तर तिला आज का शोधावसं वाटतंय?

आता सुकून कडकडीत झालेल्या चाफ्याला जाऊन तिने विचारले. "तूला केव्हा बहर येणार? कुठे हरवून गेली तुझी फुले आणि त्यांचा मृदुगंध? मी कुठून आणू कळ्या तुझ्यासाठी म्हणजे त्या अंगावर पांघरून तू पुन्हा फुलशील?" चाफा काहीच बोलला नाही. पण यावेळी त्याचे अश्रू तिला दिसले. तिने हळूच चाफ्याला दोन्ही हाताने घट्ट मिठीत घेतले आणि कोणालाही न दिसणारे काटे तिला अंगभर टोचले. काटे कसे आले तिच्या वाटेला? तिला तिच्या प्रश्नाचं उत्तर उमगलं. तिने प्राजक्ताचं झाड मुळासकट उपटून बागेबाहेर फेकून दिलं. आता चाफा फुलू लागला. त्याच्या आणि तिच्या गुजगोष्टीही फुलू लागल्या…. वाऱ्याबरोबर झुलू लागल्या.