Monday, November 7, 2016

अधांतरी

आयुष्यात खूप काही गोष्टी करायच्या असतात. योग्य वेळी त्या करू अशी आपणच आपली समजूत घालतो; पण ती योग्य वेळ कधीच येत नाही. हळूहळू जाणीव होते आयुष्य हातून निसटून जाण्याची जशी गच्च मुठीतून वाळू सरकून जाते. प्रत्येक दिवस संपताना आयुष्य संपून गेल्याची चाहूल लागते. आठवणीतील माणसं आठवत राहतात. रक्ताच्या नात्यांपेक्षाही वेगळी, नावं नसलेली पण मनाने जोडलेली आतल्या आत जपलेली अनेक नाती आठवत राहातात. त्यातलंच एक नातं आहे. अंधारलेलं... विझून गेलेलं... कधी काळी टवटवीत आणि निरागस असलेलं. आता मात्र सगळंच असंबध्द... अनाकलनीय. त्या नात्याला नव्हतं कधी कसलं कुंपण.  ना वयाचं... ना अंतराचं...  ना संवादाचं. बांधिलकी होती ती फक्त विश्वासाची... प्रामाणिकपणाची. कधी कधी त्या नात्यावर चढलेली काजळी पुसून त्याला पुन्हा लखलखीत करावं असं वाटतं; पण काळाच्या ओघात ते नातं रुतून बसलं आहे घट्ट संशयाच्या चिखलात. प्रयत्न फक्त एका बाजूनेच का होतो आहे? दुसऱ्या बाजूलाही तसचं वाटतं असेल का? पण कळणार कसं? त्यासाठी माखवून घ्यायला हवं स्वतःला त्या चिखलात. शक्य आहे आता? झेपेल आपल्याला आता हे सगळं? त्या नात्याला मोकळं करायचा प्रयत्न केला की अजूनच रुतायला होतं आणि मग सुरु होते तगमग त्या चिखलातून बाहेर पडण्याची. डोळे मिटले जातात गच्च. काळ फिरवू लागतो त्याची चक्र उलट्या दिशेने. हळूहळू एक एक गोफ विणला जातो... निस्पृह. पापण्यांवर पुन्हा बांधली जातात कोवळ्या वयातली स्वप्नांची तोरणं आणि पाणावले जातात डोळे. ते नातं कधी फुलवायचं गालावरची खळी तर कधी पुसायचं गालांवर ओघळणारे अश्रू. त्या नात्याला माहीत नव्हता जगण्यासाठी लागणारा पैशांचा ऑक्सिजन.  कुठल्यातरी अनामिक ओढीने त्या नात्याच्या गाठी एकमेकांत गुंतल्या गेल्या. मासा बनून आकाशात उडायचं की पंख लावून समुद्रात डुंबायचं? निळ्या फुलपाखरांच्या रानात बागडताना काळ्या सुरवंटाचे काटे रुततात. पुन्हा तसेच घट्ट. चिखल आणि काटे... एकाच नाण्याच्या दोन बाजू. श्वास दोन्हीकडे घुसमटतो. डोळे उघडतात तोपर्यंत खूपच उशीर झालेला असतो. चिखल बरबटू लागतो पायाला. जीवाच्या आकांताने पाय उचलले जातात पण ते नातं परतु देत नाही किनाऱ्याकडे पुन्हा. हाती उरलेलं असतं सत्य. भीती वाटते. चिखलाच्या खुणा किनाऱ्याच्या स्वच्छ वाळूवर उमटल्या तर? दोलायमान झालेल्या मेंदूत विचारांचा भुगा होतो. एकटं असलं की विचारांचं वटवाघुळ मोठं होत जातं आणि सारं आकाश व्यापून टाकतं. सुरवातच झाली पानगळीच्या ऋतुने म्हणून सारी पाने गळून गेली का? ग्रीष्माच्या चटक्यांनी जळून कोळसा झालेलं मन. पावसाचा ऋतु आला आणि मागे राहिलेलं बाकी सारं वाहून गेलं. ऋतूंचं आस्तित्व संपलं तसं चक्र सुरू झालं पहाट आणि रात्रीच्या गुंत्याचं. रात्र घेऊन येते हरवलेल्या आठवणी आणि पहाटेला समोर उभं राहतं उघडं नागडं वास्तव. माणूस नेहमी दुःखालाच गोंजारत बसतो पण इथे तर चक्क लाथाडलं गेलं दुःखाला. वेदनेची दोन रूपं आयुष्याने दाखविली. पहिल्या रूपाने मुळासकट कोलमडून पाडलं. तुटून मोडून गेलं सारं. दुसरं रूप ज्याने मुळापासून बदलून टाकलं. आयुष्याकडून ढीगभर अपेक्षा ठेवल्या आणि शेवटी जगू दे काही क्षण मला म्हणण्याइतपत अगतिकता वाट्याला आली. खंबीर असणं म्हणजे नेमकं काय? आपल्या वेदना आपले अश्रु आपली दुःखं जगापासून लपवून चेहरा सतत हसरा ठेवणं? आनंदी असण्याचा, सुखात असण्याचा दिखावा करणं? जो स्वतःच्या दुःखाला, वेदनेला समजून घेतो आणि जगासमोर स्वीकारतो तो खरा खंबीर माणूस. शब्द विरून जातात क्षणभरांत; पण स्पर्शाच्या गंधाळलेल्या खुणा जपल्या जातात. भावनांना नेहमीच शब्दांच्या कोंदणात बसवायचं नसतं. नाजूक वेळी आपण नको ते शब्द वापरून त्या भावनांचा अवमान करत असतो. शब्दांचा खेळ खेळून झाल्यावर निशब्द व्हायला होतं. नको वाटू लागते शब्दांचे अरण्य. निशब्दता किती सुंदर आहे. फक्त मखमली स्पर्श सांभाळायचे हृदयात. हे स्पर्श जगायचे असतात शब्दांचे वादळ न उठवता. नाव नसलेली नाती शिकवितात असंही जगायला. हे नातं आहे पहाटेच्या स्वप्नाचं… डोळे उघडले की आस्तित्व नसणारं. कोवळ्या उन्हाचं… सूर्य डोक्यावर आला की करपून जाणारं. अळवावरील दवबिंदुचं…म्हंटलं तर जपायचं नाहीतर वाऱ्यावर भिरभिरायचं… अधांतरी.